बारचे कर्तव्य म्हणजे बोलणे — न्यायाधीशांकडून चुकीचे कृत्य झाले असताना वकिलांनी आवाज उठवणे आवश्यक आहे

“बोलण्याचे कर्तव्य असताना गप्प राहणे हा गुन्हा आहे,” — न्यायमूर्ती एम. एस. सोनक

न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी बारला उद्देशून केलेल्या या थेट आणि निर्भीड विधानाचे संपूर्ण विधी क्षेत्राकडून स्वागत होत आहे. निर्भय व जबाबदार टीकेची अपेक्षा व्यक्त करताना, चापलूस व गप्प बसणाऱ्या वकिलांना त्यांनी स्पष्ट शब्दांत चपराक दिली आहे.

जर एखादा न्यायाधीश चुकीच्या पद्धतीने वागत असेल, भ्रष्टाचार करत असेल, किंवा न्याय देण्याऐवजी अन्याय करत असेल, तर त्या न्यायाधीशाविरोधात तक्रार करणे हे प्रत्येक वकिलाचे कर्तव्य आहे. हे केवळ नैतिक कर्तव्य नाही, तर बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांमध्येही स्पष्टपणे कायदेशीर तरतूद आहे.

मात्र वास्तव असे आहे की, अनेक वकील — विशेषतः काही चापलूस आणि स्वार्थी वरिष्ठ वकिलांच्या दबावामुळे — सत्य बोलण्याचे धाडस करत नाहीत.

काहीजण भीतीपोटी गप्प राहतात, तर काहीजण स्वतःच्या फायद्यासाठी चुकीला पाठीशी घालतात.

न्यायमूर्ती सोनक यांनी याच प्रवृत्तीवर बोट ठेवत स्पष्ट केले आहे की,

चुकीच्या गोष्टी पाहूनही गप्प बसणे म्हणजे तटस्थता नाही — ती अपराधी मौनाची साथ आहे.

बार ही न्यायव्यवस्थेची नैतिक पहारेकरी आहे. जर बारच गप्प बसला, तर न्यायव्यवस्थेचे नुकसान अटळ आहे.

म्हणूनच न्यायमूर्ती सोनक यांचा हा संदेश केवळ भाषण नसून, संपूर्ण बारसाठी एक इशारा आणि आत्मपरीक्षणाची वेळ आहे.

 

न्याय वाचवायचा असेल, तर वकिलांनी भीती आणि चापलूसी सोडून सत्यासाठी निर्भयपणे उभे राहिले पाहिजे — हीच खरी न्यायसेवा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *