सतीश सालियन यांच्या समर्थनासाठी 100 हून अधिक वकील उतरणार मैदानात!
मुंबई: दिशा सालियन प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाही रोखण्याचा, भरकटवण्याचा किंवा तक्रारदार, साक्षीदार आणि वकिलांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा खणखणीत इशारा बार असोसिएशन्स, SSR वॉरियर्स, GenZ Lawyers Association आणि मानवाधिकार संघटनांनी दिला आहे.
आरोपींशी कथितरीत्या संबंधित काही व्यक्ती 24 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सुनावणीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती समोर आल्यानंतर या संघटना आक्रमक झाल्या आहेत. न्यायालयीन कार्यवाहीत हस्तक्षेप करण्याचा किंवा न्यायप्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्याचे गंभीर परिणाम लक्षात ठेवावेत, असेही संघटनांनी बजावले आहे.
100 हून अधिक वकिलांची फौज उभी राहणार!
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी 100 हून अधिक वकील न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ वकिलांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे सतीश सालियन यांचा न्यायासाठी सुरू असलेला लढा आता अधिक व्यापक आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या अभिलेखावर आलेली सामग्री, 3 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कथितरीत्या नोंदवलेली निरीक्षणे आणि सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक निर्णय लक्षात घेता, FIR नोंदवण्यासाठी आवश्यक असलेला कायदेशीर आधार ठामपणे समोर आला आहे. आता FIR नोंदवणे ही केवळ प्रक्रियात्मक औपचारिकता उरल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या घडामोडींमुळे संबंधित गोटात प्रचंड खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
आधीही बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोप
सतीश सालियन आणि त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांना यापूर्वीही त्रास देण्याचे तसेच त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही पत्रकार आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
मात्र त्या वेळीही कायदेविषयक क्षेत्रातील अनेक सदस्य, SSR वॉरियर्स आणि सर्वसामान्य जनता सतीश सालियन व ॲड. नीलेश ओझा यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. आताही कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायाची लढाई पूर्ण ताकदीने लढली जाईल, असा निर्धार समर्थक संघटनांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांना पत्र
सतीश सालियन, या प्रकरणातील साक्षीदार आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारी पत्रे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांना पाठवण्यात आली आहेत.
सतीश सालियन, साक्षीदार किंवा त्यांच्या वकिलांसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास, त्याची जबाबदारी पत्रात नमूद केलेल्या आरोपींवर आणि निवृत्त पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर निश्चित करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका या पत्रांमध्ये मांडण्यात आली आहे.
हात लावाल, तर गाठ आमच्याशी आहे, असा स्पष्ट संदेश आता संबंधितांना देण्यात आला आहे.