कायदेशीर नोटीस देऊनही बदनामी सुरूच ठेवल्याचा आरोप; प्रतिवादींची संपत्ती जप्त करण्याची, बँक गॅरंटी घेण्याची आणि कायदेशीर अटींनुसार दिवाणी तुरुंगात पाठवण्याची मागणी!
न्यायालयीन प्रक्रियेनुसार २ हजार कोटींच्या नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी सतीश सालियन यांनी आवश्यक कोर्ट फी भरली!
संजय राऊत, अनिल देशमुख, सुषमा अंधारे, अखिल चित्रे, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांचाही प्रतिवादींमध्ये समावेश; आदित्य ठाकरे यांच्या कथित खोट्या विधानांचा पर्दाफाश करणारे पुरावे दाव्यात सादर; उच्च न्यायालयाचे आदेश आणि महत्त्वाचे पुरावे दडवून अर्धवट व खोट्या बातम्या, पत्रकार परिषदा आणि मुलाखतींद्वारे जनतेची दिशाभूल केल्याचा आणि दिशाच्या वडिलांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा गंभीर आरोप!
नुकसानभरपाईपोटी वसूल होणाऱ्या रकमेपैकी ९९ टक्के रक्कम गरिबांच्या मदतीसाठी आणि पोलीस व सरकारी यंत्रणांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या नागरिकांच्या कल्याणासाठी शासकीय निधीत जमा करण्याची दाव्यात भूमिका!
स्वतःसाठी केवळ १ टक्का, उर्वरित ९९ टक्के रक्कम पीडितांच्या मदतीसाठी! सतीश सालियन यांचा दाव्यात सामाजिक बांधिलकीचा निर्धार!
ठाणे | विशेष प्रतिनिधी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात न्यायासाठी लढा देणारे तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह आठ जणांविरोधात तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल केल्याचे सांगितले आहे. कायदेशीर नोटिसा देऊनही बदनामीकारक विधाने मागे न घेता उलट पुन्हा पुन्हा खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर आरोप या दाव्यात करण्यात आला आहे.
या दाव्यात केवळ नुकसानभरपाईचीच नव्हे, तर प्रतिवादींच्या मालमत्तेचा तपशील मागवून आवश्यकतेनुसार निकालापूर्वी मालमत्ता जप्त करण्याची, दोन हजार कोटी रुपयांची बँक गॅरंटी किंवा अन्य सुरक्षा जमा करण्याची आणि दिवाणी प्रक्रिया संहितेतील अटी पूर्ण झाल्यास संबंधित प्रतिवादींविरुद्ध दिवाणी तुरुंगवासासंबंधी आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या कथित खोट्या विधानांचे पुरावे दाव्यात!
आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात केलेली विविध सार्वजनिक विधाने कशी खोटी आणि परस्परविरोधी असल्याचा आरोप आहे, याचे तपशीलवार पुरावे दाव्यात नमूद करण्यात आले आहेत.
विशेषतः रिया चक्रवर्ती यांच्याशी ओळख नसल्याची सार्वजनिक भूमिका, ८ जून २०२० च्या रात्रीच्या ठिकाणाबाबतचे कथित स्पष्टीकरण, मोबाईल टॉवर लोकेशन, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि एनसीबीच्या तपासातील कथित इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचा संदर्भ देण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे दडवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप!
दाव्यात असा आरोप करण्यात आला आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशातील महत्त्वपूर्ण निरीक्षणे आणि तपासाशी संबंधित पुराव्यांकडे दुर्लक्ष करून प्रतिवादींनी पत्रकार परिषदा, मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्धवट, चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली.
सतीश सालियन यांची न्यायासाठीची लढाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे चित्र निर्माण करून त्यांच्या प्रामाणिकपणावर, प्रतिष्ठेवर आणि विश्वासार्हतेवर हल्ला करण्यात आल्याचे दाव्यात म्हटले आहे.
कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतरही बदनामी थांबवण्याऐवजी ती सुरूच ठेवल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम दोन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची भूमिका दाव्यात मांडण्यात आली आहे.
तसेच संबंधित बदनामीकारक व्हिडीओ, पत्रकार परिषदा, मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे तसेच भविष्यात अशा विधानांची पुनरावृत्ती रोखण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता या दोन हजार कोटी रुपयांच्या दाव्यावर न्यायालय काय निर्णय घेते आणि संबंधित प्रतिवादी काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.